मुंबई – खाटिक समाजाच्या मागण्यांसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन या समाजबांधवांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी शासन प्रयत्न करेल, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
मंत्रालयातील दालनात अखिल भारतीय खाटिक समाजाच्या विविध मागण्यांबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, सहसचिव दिनेश डिंगळे यासह वरिष्ठ अधिकारी तसेच अखिल भारतीय खाटिक समाजाचे अध्यक्ष संजय घोलप,सरचिटणीस सुजित धनगर यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे म्हणाले, खाटिक समाजाच्या विविध मागण्या या धोरणात्मक निर्णयांच्या आहेत. त्यासाठी पूर्ण अभ्यासानंतर याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून निर्णय घेतला जाईल. या समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती, जात पडताळणी करताना येणाऱ्या अडचणी, विविध योजना तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसदर्भात कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री.मुंडे यांनी सांगितले.
अनुसूचित जातीतील खाटिक समाज बांधवाना चर्मकार समाजातील गटई कामगारांप्रमाणेच स्टॉल मिळावा, या समाजाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमावा, हिंदू खाटिक मागासवर्गीय महामंडळ सुरू करावे, अखिल भारतीय खाटिक समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कै.रघुनाथराव (नाना) जाधव यांची जयंती शासनस्तरावर साजरी करावी, कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेळी मेंढी आठवडा बाजार सुरू करणे यासह विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय खाटिक समाजाचे अध्यक्ष संजय घोलप व सरचिटणीस सुजित धनगर यांच्यासह सदस्यांनी दिले.