कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेसची संकल्प सभा आज येथे संपन्न होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, नेते आणि खासदार उपस्थित आहेत. मुंडे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचे वक्तव्य केल्याने त्याची जोरदार चर्चा होत आहे.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. सध्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून वारंवार होत आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी मुंडे यांनी भाकित वर्तविले होते की पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. आणि आज राष्ट्रवादीच्या संकल्प सभेत मुंडे यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा पुनरुच्चार केला. मुंडे म्हणाले की. या करवीर नगरीतून आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पुरोगामी महाराष्ट्राचा संकल्प आम्ही सोडत आहोत. एकदा का करवीर नगरीतून एखादा संकल्प घेतला की तो पूर्णत्वास जातो, हा इतिहास आहे. २०२४ साली विधानसभा निवडणुका होतील तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री राज्यात होईल, असा संकल्प आज करुया, असे मुंडे म्हणाले. दोन दिवसात दुसऱ्यांदा मुंडे यांनी यावर भाष्य केल्याने आता ही बाब चांगलीच चर्चेची ठरत आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1517865503112384513?s=20&t=-rQWq_mCfCVXk7nJtQigOg









