बीड/औरंगाबाद – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. निमित्त आहे ते त्यांच्या दुसऱ्या पत्नीने केलेल्या फेसबुक पोस्टमुळे. मुंडे यांच्यातील प्रेमासंबंधीची माहिती पुस्तक स्वरूपातून लवकरच प्रकाशित करणार असल्याचे करुणा धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे. या फेसबुक पोस्टची सध्या जोरदार चर्चा असून या नात्यासंबंधीच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता त्यावेळी स्वतः धनंजय मुंडे यांनी संबंधित महिलेच्या बहिणीसोबत आपण परस्पर संबंधात होतो असा खुलासा केला होता. एवढेच नाही तर या महिलेपासून आपल्याला दोन मुले असल्याचाही धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट मधून खुलासा केला होता.
करुणा धनंजय मुंडे, असे त्या महिलेचे नाव असल्याची माहिती समोर आली. करुणा यांच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घेतल्यानंतर हे सगळे प्रकरण थांबले असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आता करुणा यांनी आपण पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या पुस्तकामध्ये नेमकी कोणती माहिती असणार याचीच चर्चा सुरू आहे.










