इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडच्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला केज न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर आता या प्रकरणात कसून तपास केला जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे या प्रकरणातही त्याची चौकशी केली जात आहे. कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल नसला तरी तेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. वाल्मिक कराड हे राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. गेली अनेक वर्षे ते बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे व्यवस्थापन करत आहेत. त्यामुळे कराडशिवाय धनजंय मुंडे यांचे पानही हालत नाही. याच राईट हँडमुळे धनजंय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करत आहेत. यावरुनच आता भाजप आमदार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. सरपंच हत्येप्रकरणी नेमलेल्या एसआयटीच्या अहवालानंतर धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल असे विखे पाटील म्हणाले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे.
विखे पाटील पंढरपूरमध्ये म्हणाले की, संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी १० जणांची एसआयटी टीम नेमण्यात आली आहे. हे विशेष तपास पथक बीडमध्ये तपास करुन आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करेल. हा एसआयटी अहवाल आल्यानंतर धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल.
मी जर दोषी असेल तर मला फाशी द्यावी
शरण येण्याअगोदर वाल्मिक कराड यांनी व्हिडिओ शेअर करत संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबध नसल्याचा दावा केला आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडीसमोर हजर होत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेक-यांना अटक करावी, फाशी द्यावी राजकीय कारणासाठी माझं नाव घेऊ नये. या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला फाशी द्यावी असेही त्याने या व्हिडिओत म्हटले आहे.
हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड
वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचे आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे सीआयडी वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करते का हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.