देवमामलेदार यशवंत महाराज पुण्यतिथी उत्सव
ब्रिटिश काळात मामलेदार पदावरील एका सरकारी उच्च अधिकाऱ्याने सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेमध्येच देवत्व आहे, असे मानून त्यांच्या सेवेसाठी आपले अखंड आयुष्य पणाला लावले. त्यामुळे जनतेनेही त्यांना देवत्व बहाल केले. ते अधिकारी म्हणजे देवमामलेदार यशवंत महाराज होत.
यशवंत महाराज हे मूळचे पंढरपूरच्या करम भोसे गावचे. त्यांचे संपूर्ण नाव यशवंत महादेव भोसेकर होते. अगदी लहान वयात येवला येथे सरकारी बदली कारकून म्हणून ब्रिटीश सेवेत दाखल झाले. 1869 मध्ये त्यांची तत्कालीन बागलाण प्रांतातील सटाणा येथे बढतीवर मामलेदार म्हणून नियुक्ती झाली. सरकारी उच्च पदावर पदावर असताना देखील ते सदैव जनतेच्या सेवेत तत्पर असत नागरिकांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या अडीअडचणींना मदत करण्यासाठी धावून जात असत. या परिसरातील अनेक जुने रखडलेले तंटे वाद त्यांची यशवंत महाराजांनी तत्काल सुनावण्या घेऊन सर्वमान्य सोडवणूक केली.
सुशासन काय असते याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी आपल्या कार्यातून दिले. सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या यशवंत महाराजांच्या जनतेप्रती असलेल्या सेवा कार्याची महती अल्पावधीतच संपूर्ण प्रांतात पसरली. त्यांच्याच कार्यकाळात 1870-71 बागलाण प्रांतात भीषण दुष्काळ पडला जनतेला अन्नधान्य तसेच पैसे याची प्रचंड चणचण भासू लागली. दुष्काळग्रस्त गरीब जनतेच्या हालअपेष्टा बघून यशवंत महाराजांनी त्यांच्या ताब्यात असलेला त्यावेळच्या 1 लाख 27 हजार 000 चा रोख व अन्नधान्याचा सरकारी खजिना ब्रिटिश वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न मागता तसेच आपल्या वरील नंतर होणार्या कारवाई ची पर्वा न करता गरजू जनतेसाठी संपूर्ण रिकामा केला.
परिस्थितीची भीषणता ओळखून स्वतःच्या घरातील सर्व चीजवस्तू देखील सर्वसामान्य जनतेत वाटून दिल्या फक्त नेसत्या वस्त्रानिशी ते राहिले. सर्वसामान्य नागरिकांप्रति त्यांनी दाखवलेल्या या सेवाव्रत अनुभवामुळे नागरिकांनीच त्यांना देव मामलेदार ही पदवी बहाल केली. तत्कालीन ब्रिटिश वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता देव मामलेदार यशवंत महाराज यांनी दुष्काळग्रस्त नागरिकांसाठी संपूर्ण सरकारी खजिना खुला करुन दिल्याने त्यांची चौकशी झाली त्यावेळी सरकारी तिजोरी उघडली असता सर्व खजिना जसाच्या तसा आढळल्याने ब्रिटिश चौकशी अधिकारी देखील अवाक् झाले असे सांगितले जाते.
गरजू गरीब जनतेसाठी अखंड सेवाव्रत पूर्ण करून 1857 ला देव मामलेदार यशवंत महाराज सटाणा येथील सेवानिवृत्त झाले. 18 87 मध्ये त्यांचे नाशिक येथे देहावसान झाले. बागलाण वासियांनी त्यांच्या संपूर्ण कार्याचा आदर राखत त्यांना ग्रामदैवत मानले सटाणा येथील आराम नदीकाठी देव मामलेदार यशवंत महाराज यांच्या चरण पादुका मंदिर 1900 मध्ये बांधले. तेव्हापासून दरवर्षी पौष एकादशीला देव मामलेदार यशवंत महाराज पुण्यतिथी सोहळा अखंडपणे साजरा करण्यात येतो. नाशिक येथे देखील गोदावरी घाटावर देव मामलेदार यशवंत महाराजांचे मंदिर उभारून अखंडपणे उत्सव साजरे केले जातात. ब्रिटिश काळात देखील जनतेसाठी अखंड सेवा व्रत घेतलेल्या मामलेदार पदाला जनतेने बहाल केलेले देवत्व हे यशवंत महाराजांच्या रूपाने एकमेव अद्वितीय उदाहरण होय…