देवळाली कॅम्प – गेल्या काही दिवसांपासून करोनाचा रोगाचा धोका वाढत असतांना रुग्णांना दवाखान्यात ऑक्सिजन सुविधा उपलब्ध होत नसल्याने आपल्या परिसरातील कोणी नागरिक ऑक्सिजनविना राहू नये या उदात्त हेतूने आपण मोफत ५ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन उपलब्ध करून दिली असल्याची माहिती येथील बचत गटाच्या संघटिका अनिता गोडसे यांनी दिली आहे.
खासदार हेमंत गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली लामरोडवर असलेल्या प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे व अनिता गोडसे यांच्या येथील संपर्क कार्यालयात गरजू नागरिकांसाठी ८० हजार रु.किमतीचे ५ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मशीन लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. मुंबई येथील रोटरी क्लब ऑफ क्वीन्स नेकलेस यांच्या सहकार्याने हे मशीन नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध असतील. याप्रसंगी राजश्री जाधव, संजय जाधव, विलास गिते, राहुल धूर्जड, संदीप मोगल,जयेश गोडसे, तेजस शेळके, सचिन गोडसे आदी उपस्थित होते. ज्यांना या ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची गरज असेल त्यांनी डॉक्टरांचे संमतीपत्र, आधारकार्ड दाखवत ते संपर्क कार्यालयात संपूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी तेजस शेळके (९०११११७७९५) किंवा संजय जाधव ( ८६६८५९४०३२) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.