नाशिक – निवृत्त उपजिल्हाधिकारी व इंडिया दर्पणचे सांस्कृतिक संपादक देवीदास चौधरी यांच्या १६ हायकू कवितांचा समावेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहे. रुप कवितेचे या पुस्तकात या कविता आहे. विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळा अंतर्गत असलेल्या मान्यवरांच्या संपादक मंडळातर्फे गतवर्षअखेर रुप कवितेचे हे पुस्तक प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यात या कविता आहे.
हायकू हा एक जपानी काव्य प्रकार आहे. तीन काव्यपंक्ती आणि साधारण सतरा अक्षरे, इतकीच अल्पाक्षरी असणारी ही कविता माञ कधीकधी एक मोठा आशय मांडून जाते. शेतकऱ्यांच्या दुःखांशी असलेली जवळीक आणि त्याचबरोबर प्रशासकीय सेवेचाही अनुभव पाठीशी असल्याने सामाजिक जाणिवेचा मिलाफ देविदास चौधरी यांच्या कवितेत आढळून येतो. चांदवड तालुक्यातील कुंदलगाव येथील मुळ रहिवासी असेलेले चौधरी सध्या नाशिक येथे वास्तव्यास असले तरी ते आजही शेती करतात. त्यामुळे त्यांच्या कवितेत शेतक-यांचे दुःख त्यांचे प्रश्न सहज कवितेत उतरतात. त्यामुळे त्या वास्तवाशी जवळीक साधतात.
देविदास चौधरी यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित
तसा काहीच अर्थ नाही आणि सोप्पय सगळं या कविता संग्रहातून यांच्या हायकू आणि इतर दर्जेदार कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या वेळी प्रांताधिकारी म्हणून देविदास चौधरी तिथे कार्यरत होते व त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महात्मा गांधी शांतता पुरस्कारासाठी त्यांना नामांकन प्राप्त झाले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या छोट्या-छोट्या शब्द प्रतिमांमधून निसर्गाचे आणि मानवाचे नाते शोधणारी कविता देविदास चौधरी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिली आहे.