नाशिक : ‘सोप्पंय सगळं’ या देविदास चौधरी यांचे काव्यसंग्रहात भाषेची लय, सभोवतालचं पर्यावरण सामावलेले आहे. जीवन खडतर असले तरी त्यात आनंद मानण्याचा मनमाडचा स्वभावगंध पानोपानी आढळून येतो. मनमाडच्या भाषेची लय, त्याचा गंध याच्याशी माझाही ऋणानुबंध आहे, असे प्रतिपादन जेष्ठकवी अशोक नायगावकर यांनी केले. कवी अशोक नायगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्त शासकीय अधिकारी देविदास चौधरी यांचे सोप्पंय सगळं या काव्यसंग्रहाचे प्रकाशन समारंभ कालिदास कला मंदिरात संपन्न झाला. समारंभाचे अध्यक्षस्थान आमदार तथा साहित्यिक हेमंत टकले यांनी भूषविले. याप्रसंगी मंचावर जेष्ठ समीक्षक डॉ. एकनाथ पगार, प्रकाशक सरबजीत गरचा, कवी तथा प्रकाशक हेमंत दिवटे, कवयित्री सुनंदा भोसेकर, विश्वास ठाकूर, द. भो. काळे, कवी अरुण म्हात्रे, देविदास चौधरी उपस्थित होते.
हेमंत टकले यांनी देविदास चौधरी यांची कविता चाकोरी सोडून जगण्याचा आशावाद जागवणारी असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले. मातीचं अस्सलपण असणाऱ्या कविता आहेत, आजचा समारंभ म्हणजे साहित्य संमेलनाची खरी सुरवात असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. सुनंदा भोसेकर यांनी संग्रहातील कविता या मातीशी नाळ जोडलेली आजच्या काळाची वास्तववादी कविता असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले. डॉ. एकनाथ पगार, हेमंत दिवटे, काळे यांचीही भाषणे झाली. देविदास चौधरी यांनी आपण निरंतर लिहिणार असून यासाठी आपल्या प्रोत्साहनाची गरज असल्याचे नमूद केले. प्रकाशक सरबजीत गरचा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अरुण म्हात्रे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. समारोपप्रसंगी अशोक नायगावकर, दिवटे, भोसेकर, म्हात्रे यांनी कविता सादर केल्या. समारंभ यशस्वीतेसाठी राजू देसले, मंगेश काळे, गौतम संचेती यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास साहित्यिक, कवी तसेच साहित्यप्रेमी यांची लक्षणीय उपस्थिती होती,
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/245028297571459/