सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाटण तालुक्यातील साईकडे गावास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. सरनौबत मानाजी मोरे यांचे हे गाव आहे. या गावात येण्याची उत्सुकता होती. आज या गावास भेट दिल्याचे समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार प्रवीण दरेकर, साईकडे गावचे सरपंच सुवर्णा मोरे, उपसरपंच गणेश यादव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे सद्या राज्याचे नेतृत्व करत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत गावाच्या विकासासाठी सर्व ती मदत करू. गावासाठी वांग नदीच्या काठावर पूर संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी विभागाला योग्य त्या सूचना दिल्या जातील. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या मागण्या पूर्ण करू. पूर संरक्षक भिंत बांधण्यासाठी वेळ लागेल पण तो पर्यंत गावात पुराचे पाणी येऊ नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी साईकडे गावात बांधण्यात येणाऱ्या पूर संरक्षक भिंतीच्या ठिकाणची स्थळ पाहणी केली. तसेच ग्राम दैवत श्री मसनाई देवीचे दर्शन घेतले.