मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीत प्रतिक्रिया दिली. ठाकरेंच्या भाषणात संताप दिसत होता आणि निराशाही झळकत होती. हा संताप नाकाखालून ४० लोक निघून गेल्याचा आहे, असा थेट वार फडणवीस यांनी ठाकरेंवर केला.
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फडणवीस भिवंडीत आले होते. त्यावेळी त्यांनी ठाकरेंच्या खेडमधील भाषणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘खरं तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणात हताशपणा दिसून येत होता. ते निराश दिसत होते. त्यांच्याकडे मुद्दे नव्हते. त्यामुळे तेच तेच शब्द, तिच तिच वाक्य आणि तेच जुने टोमणे मारून त्यांनी भाषण पुढे नेलं. हे सारं त्यांचे ४० लोक नाकाखालून निघून गेल्याच्या दुःखातून आलं आहे.’ फडणवीस यांनी आपल्या टिकेतून उद्धव यांच्यावर थेट निशाणा साधला. आम्ही हेरलं म्हणून त्यांना चोरलं असेही फडणवीस स्पष्टपणे म्हणाले.
कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच ठाकरे यांच्या खेडमधील भाषणावर बोलण्याची संधी साधली. यावेळी कपिल पाटील यांचेही धुवांधार भाषण झाले. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही कपिल पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी भिवंडीत दाखल झाले होते. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही खेडमधील सभेवर निशाणा साधला. खेडच्या सभेत अख्ख्या महाराष्ट्रातील कार्यकर्ते आले होते. त्यामुळे एकट्या योगेश कदमला पराभूत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आणावा लागतो, यातच कदम यांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या चौपट सभा
उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या चौपट सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. भाजप आणि शिंदे गटाची आशीर्वाद यात्रा सुरू आहे. मात्र खेडमध्ये शिवीगाळ, गद्दार आणि खंजिर यात्रा सुरू असल्याची टीकाही उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1632429109363212288?s=20
Devendra Fadnavis Reaction on Uddhav Thackeray Speech