नाशिक – नाशिकमधील कोरोनाच्या परिस्थितीची दखल घेऊन विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज एकत्रीत नाशिक दौरा केला. यावेळी त्यांनी अगोदर सिव्हिल व बिटको हॅास्पिटलला भेटी दिल्या. त्यानंतर नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयात विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमवेत कोराना आढावा बैठक घेतली.
या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी फडणवीस म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील कोविडचा पॅाझिटीव्हीटी रेट जास्त आहे. नाशिकमधील परिस्थिती गंभीर आहे. आज जिल्हा रुग्णालयात पाहणी करून माहिती घेतल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिकला बेड्स आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर तुटवड्याचा प्रश्न गंभीर आहे. रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये, यासाठी आमचा दबाव राहील. केंद्राने रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा सर्वात मोठा साठा महाराष्ट्राला दिला आहे. देशात सर्वात जास्त ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला त्याच वाटप सुयोग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी राज्यसरकारची असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी जेथे बलशाली नेते आहे. तेथे ऑक्सिजन आणि औषध पुरवठा जास्त असे होऊ नये असेही सांगितले. यावेळी त्यांनी ऑक्सिजनचे २ जास्तीचे टँकर नाशिकसाठी मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गुजरातमधून एक ऑक्सिजन टँकर व जिंदालमधून एक जास्त ऑक्सिजन टँकर नाशिकसाठी मिळणार आहे. केंद्र सरकारने अतिशय सुयोग्य पद्धतीने वाटप केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात अंतर्गत वाटप करतांना केंद्राप्रमाणेच सुयोग्य वाटप करावे , सर्व पॅावरफुल्ल नेत्यांना विनंती, तुमच्या जिल्ह्याव्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांकडेही लक्ष द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांनी माझा दौरा माहीत नसल्यामुळे कदाचित त्यांनी बैठक बोलावली असा चिमटाही काढला. जिल्हा शल्य चिकित्सक आणि विभागीय आयुक्तांसोबत चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारी काम आहे ते झाले पाहिजे, मंत्र्यांनी जिल्ह्याकडे लक्ष दिले पाहिजे हे खरे असले तरी मंत्र्यांनी आपण राज्याचे मंत्री आहोत हे विसरू नये. राज्य सरकारने वारंवार केंद्राकडे बोट दाखवू नये जनतेच्या पाठीशी उभे राहावे या मताचा मी आहे. साधनांचा योग्य प्रमाणात वापर व्हावा असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा शासकीय रुग्णालयास भेट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी दुपारी ३ वाजता नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयास भेट दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडून देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी रुग्णालयात कोरोना वॉर्ड आणि ऑक्सिजन बेड्सची माहिती जाणून घेतली. रुग्णालयात जिल्हा रुग्णालयातील कुंभमेळा इमारतीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र कोरोना वॉर्ड तयार करण्यात आला आहे. वॉर्डमध्ये १५० बेड्स वाढविण्यात आले आहे. मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ऑक्सिजन साठा उपलब्ध झाल्यानंतर कोरोना वॉर्ड सुरु केला जाणार आहे, अशी माहिती फडणवीस यांना दिल्याचे डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, रियाज शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, खासदार भारती पवार, आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.