पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची कुठलीही शक्यता नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच, पुणे जिल्ह्याच्या विभाजनाच्या मागणीबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात लोकसभा निवडणुका आम्ही संपूर्ण ताकदीने जिंकू आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागून त्याही जिंकू. या दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची कुठलीही शक्यता नाही.
महाविकास आघाडी पुन्हा एकदा वज्रमूठ सभा प्रारंभ करणार असल्याच्या बाबतीत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वज्रमुठीला आधीच तडे गेले आहेत. कुणी कुठे उभे रहायचे, कुणी कुठे बसायचे यावर अधिक चर्चा सुरू आहेत. या नेत्यांबद्दल शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात विस्तृतपणे लिहिले आहे, त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पोपट मेला आहे, हे पूर्णपणे कळले आहे. तरीही तो मान हलवतो आहे, त्याचे हातपाय हलताहेत, असे त्यांना बोलावे लागते. कारण, त्यांना तसा संदेश त्यांच्या लोकांना द्यायचा आहे.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन पुन्हा एकदा बारामती दौर्यावर येणार असल्याच्या बातम्यांबद्दल पत्रकारांनी विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बारामतीवर तुमचे लक्ष अधिक असते, त्यामुळे तेथील केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी तुम्हाला दिसतात. पण अन्यही लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री येतात, दोन दिवस थांबतात आणि तेथील तयारीचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतात.
राज्य सरकारने पुण्यातील प्रकल्पांना 1100 कोटींचा निधी दिलेला आहे. यात कात्रज-कोंडवा रस्ता सुद्धा आहे. पहिल्या टप्प्यासाठी 200 कोटी रुपये दिले आहे. जिल्हा विभाजनाच्या अनेक मागण्या आमच्याकडे आहेत. त्यामुळे त्यावर एकत्रितपणे विचार करण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
Devendra Fadnavis on Elections and Pune District