मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एका अज्ञात महिलेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालया बाहेर तोडफोड करत घोषणाबाजी सुध्दा केली. मात्र ती काय घोषणा देत होती. हे मात्र समजले नाही. विशेष म्हणजे या महिलेने पास न काढता गेटमधून आत एन्ट्री केली. त्यानंतर ही तोडफोड केली.
या घटनेची मुंबई पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून महिलेचा शोध घेतला जात आहे. मंत्रालयातील ही मोठी चूक असल्याचे बोलले जात आहे. मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटमधून महिला आत मंत्रालयात आली. त्यानंतर तिने देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालया बाहरे तोडफोड केली.
या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले आहे की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची बातमी येतेय. गृहमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत हा अक्षम्य हलगर्जीपणा चिंतेची बाब आहे. जर गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर राज्यातील लेकिबाळींच्या सुरक्षेची कल्पना न केलेली बरी..