विशेष प्रतिनिधी, जळगाव
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी प्रथमच खडसेंच्या मतदारसंघात गेले. या दौ-यात देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ताईनगर येथील खडसेंच्या घरी जाऊन भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. या भेटीनंतर जळगाव जिल्ह्यासह राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीस मंगळवारी थेट जळगावात रक्षा खडसेंच्या भेटीसाठी पोहोचले. एकनाथराव खडसे यांनी भाजपला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर फडणवीस पहिल्यांदात जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आले होते. फडणवीसांनी यावेळी मुक्ताईनगरमधील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. याशिवाय वादळ आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही त्यांनी पाहणी केली.
जळगाव जिल्ह्यातील भाजपची पडझड बघता पक्षबांधणी संदर्भात ही त्यांनी खा. रक्षा खडसेंसोबत चर्चा केली. गेल्या आठवड्यात मुक्ताईनगर नगर पंचायतीमधील भाजपच्या आजी माजी दहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. या विषयावर त्यांनी चर्चा केली.