इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर ठाकरे बंधु विजयी मेळावा मुंबईत वरळी डोम सभागृहात साजरा झाला. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. यावेळी राज ठाकरे यांनी २० वर्षांनंतर उध्दव व मी एका मंचावर येत आहोत. जे बाळासाहेबांनाही जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हा दोघांना एकत्र आणण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केले असे सांगितले. तर उध्दव ठाकरे यांनी आमच्यातील अंतरपाट अनाजीतपंतांनी दूर केले. आता अक्षता टाकायची गरज नाही असे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
त्यानंतर आता देवेंद्र पडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया पंढरपूर मधून आली आहे. त्यांनी मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दोन्ही बंधू एकत्र येण्याचे श्रेय त्यांनी मला दिले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील. पण, मला असे सांगण्यात आले होते की, विजयी मेळावा होणार आहे. पण, त्या ठिकाणी भाषण रुदाली देखील झालं, मराठी बद्दल एक शब्द न बोलता, केवळ आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हत. ही रुदाली होती असे सांगत त्यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.
यावेळी त्यांनी २५ वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्या लायक ते येथे काहीच काम करु शकले नाहीत. पण, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा मोहरा बदलला. त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार झाला. आम्ही बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला पत्रा चाळीतील मराठी माणसाला, अभ्युद्य नगरच्या मराठी माणसाला स्वत.च्या हक्काचे घर त्याच ठिकाणी दिलं असे सांगत उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.