इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून यात आपला मोठा धक्का बसला असून भाजपने मुसंडी मारली आहे. जवळपास २७ वर्षांनी भाजप दिल्लीत सत्तेत आले आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांमध्ये भाजपने ४८ जागांवर विजय मिळवला. तर आपने २२ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेसचे सर्वात वाईट प्रदर्शन या निवडणुकीत दिसून आले. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. या निवडणुकीत आपचे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया या मोठया नेत्यांचा पराभव झाला आहे.
या मोठ्या विजयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत म्हटले आहे की, जनशक्ति सर्वोपरि! विकास जीता, सुशासन जीता। माझ्या सर्व दिल्लीतील बंधू भगिनींना ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन! तुम्ही दिलेल्या उदंड आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. ही आमची हमी आहे की आम्ही दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तेथील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. यासोबतच, विकसित भारताच्या उभारणीत दिल्लीची महत्त्वाची भूमिका आहे याचीही आम्ही खात्री देतो.