देवळाली कॅम्प – देवळाली कॅम्प शहरापासून ४ किमी अंतरावर असलेल्या शिगवे बहुला येथे कॅन्टोमेन्ट बोर्डाचे माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात पहिल्याच दिवशी १०० लोकांना कोविड प्रतिबंधकलस देण्यात आली.
कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने देशभर लसीकरण सुरू केले आहे, देवळाली हद्दीतील सर्व आठही वॉर्डासाठी कॅन्टोमेन्ट हॉस्पिटलमध्ये ही सुविधा सुरू आहे. वॉर्ड क्रमांक ७ मधील शिगवे बहुला परिसर शहरापासून काहीसा दूरवर असल्याने येथील नागरिकांना लस घेणे कामी मोठी अडचण निर्माण होत आहे, ही बाब कॅन्टोमेन्ट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाड यांनी कॅन्टोमेन्ट मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांचे निदर्शनास आणून दिली असता जिल्हा प्रशासन यांचे मंजुरी नुसार शिगवे बहुला येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात काल पासून ४५ वर्षा वरील नागरिक यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. या केंद्रांचे उदघाटन प्रसंगी माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाड, रिपाइंचे देवळाली कॅम्प शहर अध्यक्ष पंडित साळवे, युवा सेना शहर प्रमुख प्रमोद मोजाड, डॉ. जयश्री पाटील, पोलिस पाटील बाळासाहेब देशमुख, सुरेश गुळवे,विठ्ठल मेढे, विजय गायकवाड उपस्थित होते,
अन्य वार्डात द्यावी सुविधा
कॅन्टोमेन्ट बोर्डाचे वॉर्ड क्रं ४,५,६,७,८ हे शहरापासून दूरवर असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला यांना कॅन्टोमेन्ट हॉस्पिटलमध्ये येणे सोईचे होत नाहीत. वॉर्ड ७ साठी आजपासून ही सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र इतर वॉर्डसाठी जिल्हा परिषदेच्या मान्यतेतून त्या त्या वॉर्डातच लस देण्यासाठी प्रयत्न केला जावा. सध्या कॅन्टोमेन्ट हॉस्पिटलमध्ये देवळाली मतदार संघातील सर्वच गावांमधील नागरिकांची कोरोना तपासणीसाठी स्बॅब घेतला जात आहे. त्यामुळे नागरिकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता अपुरी पडत असून येथे जिल्हा आरोग्य विभागाने येथे अधिक यंत्रणा पुरविणे गरजेचे झाले असून याबाबत कॅन्टोन्मेंट प्रशासनाने देखील याबाबत पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे मोजाड यांनी सांगितले.