मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यात देवळाली विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव यांची उमेदवारी कायम असल्यामुळे येथे महायुतीत पेच निर्माण झाला आहे. शिंदे गटाने त्यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले होते. पण, त्यांनी पक्षाचा आदेश पाळला नाही. त्यामुळे शिंदे गटाने निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र देऊन एबी फॅार्म रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. पण, त्यांची मागणी निवडणूक निर्णय अधिका-यांनी फेटाळली. त्यामुळे आता देवळाली विधानसभा मतदार संघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना उमेदवारी दिली आहे. आता त्यांच्या महायुतीच्याच अहिरराव उमेदवार असणार आहे.
राजश्री अहिरराव व धनराज महाले यांना थेट एेनवेळी हेलिकॅाप्टरने एबी फॅार्म पाठवून उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले होते. त्यानंतर नामनिर्देशपत्र छाननी नंतर माघार घेण्यास सांगण्यात आले. त्यात धनराज महाले यांनी माघार घेतली. पण, देवळालीच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज आता कायम राहणार आहे. एकदा नामनिर्देशपत्राची छाननी झाली तर फक्त उमेदवारालाच माघार घेता येते. पक्षाला सुध्दा तो अधिकार नसतो हा सर्वश्रूत नियम आहे. तरी शिंदे गटाने पत्र दिले व अपेक्षेप्रमाणे ते पत्र फेटाळण्यात आले.
देवळाली विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाने योगेश घोतप यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथे शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट एकमेकांविरुध्द भिडणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराला याचा फायदा होऊ शकतो.