विहितगाव, बेलतगव्हाण व मनोली येथील शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानचे नाव आहे. ते इनाम वर्ग तीन व भोगवटदार २ हे शेरे कमी करावेत अशी सुमारे पाच हजार शेतकऱ्यांची मागणी आहे. गत ४६ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास खुंटला आहे. अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच एकलहरा येथील विद्युत प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु व्हावा म्हणुन त्या परिसरातील कामगारांनी अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलनही केले आहेत. कामगारांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी तसेच वीज निर्मितीचेही सातत्य समतोल कायम राखण्यासाठी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले त्यासाठी आपण जातीने लक्ष घालावे अशी मागणी केली. नाशिक सहकारी साखर कारखाना हा पाच तालुक्यातील शेतकऱ्यांचे आशास्थान आहे. कारखाना आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे त्यासाठी हा कारखानाही शेतकऱ्यांच्या हितासाठी व परिसराच्या विकासासाठी सुरू होणे अत्यावश्यक असल्याने शेतकरी प्राण कंठाशी लावून चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आश्वासित केल्याचे आ.आहिरे यांनी सांगितले.