नाशिक – गेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये प्राणवायू अभावी झालेले उपचाराबाबत हाल बघता येथील भालेराव परिवार यांनी पुढाकार घेत मुंबईस्थीत हंसराज दामोदरजी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या सहकार्याने देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल करिता ३० लाख रुपये किमतीचे ऑक्सिजन प्लांट उभे करुन दिले.
मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नाशिकसह राज्यभरात थैमान घातले होते यादरम्यान उपचारासाठी अनेकांना जाणवणारा प्राणवायूचा तुटवडा हा मुख्य भाग बनला होता. खासदार हेमंत गोडसे यांनी याबाबत चिंता व्यक्त
करताना मित्र परिवारातील संजय भालेराव यांना याबाबत देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड भागातील रुग्णालया करता ऑक्सिजन प्लांट उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार मुंबईस्थित हंसराज दामोदरजी चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन पिऊभाई जसरानी, राजेंद्र सांगळे व भालेराव परिवार यांनी सहभाग घेत याबाबत निर्णय घेण्याचे ठरविले. त्यानुसार ट्रस्टच्या व भालेराव परिवाराच्या माध्यमातून देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल करता ३० लाख रुपये खर्चाचे ऑक्सिजन प्लांट उपलब्ध करून दिला. येत्या आठ दिवसात हा ऑक्सिजन प्लांट देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात खासदार हेमंत गोडसे संजय भालेराव अॅड. राजीव भालेराव, शैलेश भालेराव रवींद्र भदाणे आदींनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांची भेट घेत आपण हंसराज दामोधर चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने स्वर्गीय मिलिंद विष्णुपंत भालेराव यांच्या स्मरणार्थ ३० लाख रुपये किमतीचे ऑक्सिजन प्लांट देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलला प्रदान करीत असल्याचे सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी आभार व्यक्त करताना भालेराव परिवाराने ही समस्या सोडविण्याचा घेतलेला पुढाकार देवळाली कॅम्पवासीयांसाठी मोलाचा असल्याचे सांगितले. गुजरात येथील बडोदा शहरातून येत्या आठ दिवसात हे ऑक्सिजन प्लांट देवळाली दाखल होणार असून दररोज सुमारे ३५ रुग्णांना १० एन एम क्यू ऑक्सिजन उपलब्ध होणार असून यासाठी भालेराव परिवाराने केलेले सहकार्य मोलाचे असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी केले.