नाशिक – देवळाली कॅम्प पोलिसांनी अवघ्या पाच तासात घरफोडी करणा-या महिलेचा तपास करुन तिला गजाआड केले आहे. या महिलेकडून पोलिसांनी पाच लाखाचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. देवळाली कॅम्प येथे दिवसा झालेल्या या घरफोडीमुळे खळबळ उडाली होती, पण, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत पाच तासात एका सराईत घरफोडी करणा-या महिलेला ताब्यात घेतले. पोलिसांनी हा तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केला व त्यात त्यांना यशही मिळाले.
शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास देवळाली कॅम्प येथील वेलकम फरसाण समोर श्रीमती उषा शंकरलाल दुसिया यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून सोन्याचे दागिने व ७५ हजाराची रोकड असा सुमारे पाच लाख रुपयांचा एेवज या महिलेने लंपास केला होता. त्यानंतर पोलसांनी या चोरीचा तपास सुरु करुन रात्री दहाच्या सुमारास देवळाली गाव येथील साठे नगर भागात पोलिस पथकाने सापळा रचून या महिलेला ताब्यात घेतले. या महिलेची कसून तपासणी केल्यानंतर तीने गुन्ह्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक कुंदन जाधव यांच्यासह उपनिरिक्षक संदेश पाडवी, अंबादास बकाल, जगदाळे, सुभाष जाधव, राहूल बलकवडे, बागूल आदींच्या पथकाने हा तपास केला.