देवळाली कॅम्प – भारतातील पुढील पिढीला मार्गदर्शक बनण्यासाठी सर्व माजी लष्करी अधिकारी व जवानांनी ज्याप्रमाणे देशसेवा करतांना आपल्यावरील दायित्व व कर्तव्य निभावले त्याचप्रमाणे आता नवराष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी पुढे येणे ही काळाची गरज आहे. त्यासोबत ही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून सर्वानी एकत्रित काम उभारावे असे प्रतिपादन परमवीर चक्र प्राप्त ग्रेनेडियर कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी केले. प्रत्येकाने देशसेवेसाठी पुढे येणे गरजेचे असल्याचा संदेशही दिला. देवळालीतील लामरोड भागात असलेल्या नक्षत्र सोसायटीमध्ये कारगील योद्धा नायक दीपचंद यांनी आपल्या घरात तब्बल देशातील २१ परमवीर चक्र प्राप्त योद्ध्यांची फोटो घरात लावत ‘ पीव्हीसी वॉल ‘(परमवीर चक्रप्राप्त योद्ध्यांची भिंत ) साकारली असून या वॉलची पाहणी करण्यासाठी ते देवळालीत आले होते.
यावेळी कीर्तीचक्र प्राप्त सुबेदार संतोष राळे, शौर्य चक्र प्राप्त पॅरा कमांडो मधुसुदन सुर्वे, कॅप्टन कमलेश सिंग, से. नि. हवा. जगन्नाथ शिरसाठ, शिर्डी संस्थानचे विश्वस्त के. सी. पांडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त उपनिरीक्षक मंगेश नायक, नौदल सेवानिवृत्त व प्रशिक्षक रामसिंगजी सांगा, नायक सुभेदार कल्याण सिंग, वीरनारी अनिता आहिरे, वीरपिता तुकाराम झनकर, चंद्रकांत गोडसे, सुसाराज आचारी आदींसह मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना कॅप्टन यादव म्हणाले कि, ज्याप्रमाणे माजी लष्करी अधिकारी दीपचंद यांनी घरामध्ये परमवीर वॉल साकारत देशसेवकांप्रती आदर व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक भारतीयाने आपल्या देशसेवकांप्रती आदर व्यक्त करावा जेणेकरून देशभक्तीची हि प्रेरणा पुढील पिढीला देखील देशसेवेची उर्मी निर्माण होईल.
प्रारंभी परमवीर चक्र भितींवर ग्रेनेडियर कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांची नव्याने प्रतिमा त्यांच्याच हस्ते भिंतीवर लावण्यात आली. कार्यक्रमादरम्यान तरुणांनी भारत माता कि जय व जय हिंद जय भारतचा जयघोष करण्यात येऊन भारत माता प्रतिमीचे पूजन करण्यात आले. कॅप्टन यादव यांच्यासह उपस्थित सेवानिवृत्त लष्करी अधिकारी यांचा शाल स्मृतिचिन्ह व नारळ देत सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकातून नायक दीपचंद यांनी आपण देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांसह विशेष सैनिकांसाठी कार्य करत असून यामध्ये अनेकांचे सहकार्य मिळत असून आपण त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठीच घरामध्ये २१ परमवीर चक्र प्राप्त लष्करी अधिकारी व जवानांच्या प्रतिमा लावल्या असून आपले दोन्ही पाय व एक हात नसताना देखील आपल्यातील इच्छाशक्ती अद्यापही कमी झाली नसल्याचे सांगितले. यावेळी सुबेदार संतोष राळे, पॅरा कमांडो मधुसुदन सुर्वे, शिर्डी संस्थानचे विश्वस्थ के. सी. पांडे यांनी मनोगतातून प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या माध्यमातून देशसेवा करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत धिवंदे तर आभार आभार सुजितकुमार सिंग यांनी मानले.