प्रभारी तहसीलदार बनसोडे यांनी दिली माहिती
देवळा : तहसिल कार्यालयाचे वतीने महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १५५ चे अभियाना अंतर्गत हस्तलिखीत मुळ सातबारा व संगणकीकृत सातबारा तंतोतंत जुळविण्यासाठी त्यात झालेल्या हस्तदोष चुका दुरुस्तीकामी २४ जून ते १२ जुलै २०२१ पर्यंत सकाळी ९ पासून गांव निहाय शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती प्रभारी तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली.
महसुल दप्तरी सातबारा संगणकीकरणाची मोहिम सुरु आहे. संगणकीकृत करतांना कामकाजाच्या ओघात काही हस्तदोष झाल्याचे दिसून आले असून त्यात दुरुस्ती करण्यासाठी नागरीकांना तहसिल कार्यालय व तलाठी कार्यालयामध्ये पाठ पुरावा करावा लागत आहे. यात जनतेचा वेळ वाया जात असून दप्तर दिरंगाईचा सुर जनतेत दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेऊन देवळा तहसिल कार्यालयाने या विशेष शिबिराचे जनतेच्या सोईसाठी आयोजन केले आहे.
या शिबिरास देवळा तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी त्यांच्या मिळकतीच्या सातबारा मध्ये झालेल्या हस्तदोषाच्या बाबतीत त्यांच्या कडील कागदोपत्री पुराव्यासह अर्ज करावा व या शिबिरास हजर रहावे यावेळी तात्काळ निर्णय घेऊन हस्तदोषाचा निपटारा करुन जनतेच्या अडचणी दुर केल्या जाणार आहेत. दरम्यान या बाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनीही जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी उपाय योजना करण्या बाबत सुचित केलेले आहे. त्यानुसार विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून देवळा तालुक्यातील जनतेने त्यांच्या कडील कागदोपत्री पुराव्यांसह शिबिरास मोठया संख्येने हजर राहुन सहकार्य करावे. असे आवाहन प्रभारी तहसिलदार विजय बनसोडे यांनी केले आहे.