राजपाल अहिरे
देवळा – जन्मदात्री आई नकुशी झालेल्या पोटाच्या गोळ्याला जन्मताच कुत्र्यांसमोर फेकते तेव्हा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे ब्रीद ही तुच्छ वाटू लागते. नवजात मुलीला जन्मानंतर काही क्षणातच मोकाट कुत्र्यांच्या स्वाधीन करतांना माता न तू वैरीण झालेल्या आई विषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे
.देवळा तालुक्यातील वासोळ येथे सोमवारी ( दि.१४ ) हृदयद्रावक तशीच संतापजनक घटना उजेडात आली. येथील आदिवासी वस्तीतील असलेल्या पडक्या झोपडीजवळ एका अज्ञात व्यक्तीने काही तासापूर्वी जन्माला आलेल्या एका स्त्री जातीच्या अर्भकाला फेकून दिले. त्यानंतर परिसरातील भटक्या कुत्र्यांनी सदर नवजात शिशूच्या पायाचे लचके तोडले तेव्हा त्याच्या रडण्याच्या आवाजाने आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी शोधाशोध केली असता ही संतापजनक घटना उघडकीस आली.
सदर घटनेची माहिती पोलीस पाटील कैलास खैरणार व तंटामुक्ती चे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मिळाली असती त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या नवजात शिशूला गावातील आरोग्य वर्धिनी केंद्रात तात्काळ दाखल केले. गंभीर स्थिती असल्याने तिला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून जन्मदात्र्या आईनेच स्वतःच्या पोटाच्या गोळ्याला कुत्र्यांच्या हवाली केल्याने सर्व थरातून संताप व्यक्त केला जात असून देवळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.