देवळा – सटाणा देवळा सीमेवरील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या होत असलेल्या वाळू उपशावर प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने लोहोणेर आणि ठेंगोडा येथील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी गिरणा नदीत वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बसून ठिय्या आंदोलन करत सटाणा व देवळा तालुका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
गिरणा नदी पात्रातून गत काही महिन्यांपासून बेसुमार अवैध वाळू उपसा होत असून लोहोणेर-ठेंगोडा येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच शेतकऱ्यांनी अनेकवेळा यासंदर्भात तक्रारी करूनही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे वाळू माफियांवर कडक कारवाई होत नसल्याने प्रशासन वाळू माफियांना पाठीशी घालत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
काही दिवसांपूर्वी वाळुने भरलेले ट्रॅक्टर कांदा पिकांत चालवून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाल्याची घटना ताजी असताना बुधवार दि. ९ रोजी रात्रीच्या अंधारात बेसुमार अवैध वाळु उपशामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन तोडल्याने गुरुवारी (दि.१० )संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह लोहोणेर-ठेंगोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह ग्रामस्थांनी गिरणा नदी पात्रात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला.
यावेळी लोहोणेर ग्रामपंचायतीचे सदस्य सतिष सोमवंशी, रतिलाल परदेशी, धोंडु आहिरे, चंद्रकांत शेवाळे, निंबा धामणे, दिलिप भालेराव, दीपक बच्छाव, रमेश आहिरे, योगेश पवार,मच्छिंद्र बागुल, हिरामण बागुल प्रल्हाद बागुल, रामदास उशिरे, पोलिस पाटील अरुण उशिरे ठेंगोडा ग्रामपंचायत चे उपसरपंच नारायण निकम, ग्रा.प.सदस्य रवींद्र मोरे, तुळशीदास शिंदे, मा.पो.पाटील कचरुदास बागडे, माजीउपसरपंच प्रकाश बागुल, आदी उपस्थित होते.
चौकशी करून कारवाई करावी
रात्रीच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांमुळे आमचे आर्थिक नुकसान झाले त्यांची भरपाई कोण करून देणार? तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने लोहोणेर – ठेंगोडा मंडळ अधिकाऱ्यासह तलाठी यांची चौकशी करून कारवाई करावी.
– बापू बागुल : शेतकरी लोहोणेर