नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळा तालुक्यातील दहीवड येथे सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याने जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. सुदैवाने शाळेची सुट्टी झालेली असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. शाळेत असलेल्या वस्तूंचे मात्र पावसाच्या पाण्याने भिजून नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील आज काही भागात आज पुन्हा वादळीवारा आणि पावसाने हजेरी लावली. त्यात शेतीचे मोठे नुकसान झाले.
कालही जिल्ह्यात सायंकाळी कळवण, चांदवड, येवला तालुक्यातील अनेक भागात हलक्या स्वरूपाची गार व पावसाने हजेरी लावली. चांदवड तालुक्यातील वाडवराडी, दुगाव, निमोण परिसरात गारा पडल्या. गेल्या चार दिवसापासून या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.