बाबा पवार, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देवळा : राज्य उत्पादन शुल्क मालेगाव विभागाने उमराणे देवळा रोडवर अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर छापा मारून विनापरवाना देशी, विदेशी दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले असून चार संशयितांना अटक करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळा तालुक्यात महामार्गानजिक ढाब्यांवर विनापरवाना देशी व विदेशी दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेऊन शुक्रवार ( दिनांक ७ ) निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालेगाव विभागाने दारू विक्रेत्यांवर कारवाई केली. यावेळी उमराणे देवळा रोड वरील उमराणे येथील हॉटेल भाऊसाहेब ढाबा, खारी फाटा येथील हॉटेल सह्याद्री ढाबा, हॉटेल रायबा ढाबा तसेच धोबीघाट येथील देश-विदेश ढाबा येथे धाडी टाकून देशी दारूच्या १०६ बाटल्या व विदेशी दारूच्या ४६ बाटल्या जप्त करून एकूण १४ हजार ५३० रुपयांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक केली आहे. सदर कारवाई विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत दुय्यम निरीक्षक पी. एस. कडभाने, जवान बहिरम, मस्के व वाहन चालक महेंद्र बोरसे यांनी केली.