बाबा पवार (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
देवळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन योजना’ गती घेत असून, चांदवड-देवळा मतदार संघातील ग्रामपंचायतींना किंवा जनतेला या योजने बाबत काही अडचणी असल्यास त्यासंबंधीची कागदपत्रे आमदारांच्या कार्यालयात येत्या दोन दिवसात जमा करण्याचे आवाहन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी देवळा येथील आयोजित पत्रकार परिषदेत केले.
जल जीवन मिशन योजने अंतर्गत प्रत्येक गावात ‘हर घर नल, हर घर जल’ या योजनेच्या बिद्रवाक्याप्रमाणे पाणी पोहचविण्याचा या योजनेचा उद्देश आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचा दि. २९, ३० रोजी शिर्डी लोकसभा दौरा आहे. त्यादरम्यान या योजने बाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या सोबत नाशिक येथे आमदार डॉ. आहेर यांनी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत योजनेचा उद्देश सफल होण्यासाठी आ.डॉ. आहेर चर्चा करणार आहेत. तेव्हा ज्यांना कुणाला या योजने बाबत अडचणी असतील त्यांनी येत्या दोन दिवसात त्यासंबंधीची कागदपत्रे आमदारांच्या कार्यालयात जमा करावेत असे आवाहन आ. डॉ. आहेर यांनी केले आहे.
पंचनामे करण्याचे निर्देश
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या भागातच पूर्वी पिकांचे पंचनामे करण्यात येत होते. त्या निकषात आत्ताच्या सरकारने बद्दल केला असून, सततच्या पावसामुळे जरी पिकांचे नुकसान झाले असेल तरी त्या भागातील पिकांचे पंचनामे करण्यात येणार आहेत. या बाबत आ. डॉ. आहेर यांनी नाशिक जिल्हाधिकारी यांची भेट घेत निकषात केलेल्या बदलाच्या अनुषंगाने देवळा तालुक्यातील संबंधितांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
डॉ. राहुल आहेर, आमदार