बाबा पवार, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देवळा : सामाजिक शांतता कायम ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेणाऱ्या पोलिसांचे दर्शन तर नेहमीच होत असते. मात्र त्या कठोर भूमिकेमागील पोलिसात देखील एक माणूस, एक भाऊ, एक पिता, एक पुत्र असे अनेक रूप दडलेले असतात. अशाच एका पोलीसातील बापाचे दर्शन देवळा येथील पाचकंदील परिसरात दिसून आले.
देवळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस नाईक विजय सोनवणे हे कर्तव्यावर असतांना देवळा येथील पाचकंदिल परिसरात एक टपरीवर चहा पित होते. त्याच दरम्यान एक मुलगी अनवाणी पायाने शाळेत जातांना दिसली अन त्या पोलिसातील बाप जागा झाला. सोनवणे यांनी त्या मुलीला जवळ बोलावून आस्थेने विचसरपुस केली. आई कांद्याच्या खळ्यावर कामाला जाऊन आपला प्रपंच चालवते. मजुरी करत असताना भविष्यात आपल्या मुलींना स्वाभिमानाने जगता यावे त्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी दोघा मुलींना शाळेत काटकसर करून शाळेत पाठवते. त्या मातेबद्दल सोनवणे यांचा मनात आदर निर्माण झाला. त्यांनी तात्काळ त्या मुलीच्या आईच्या परिस्थिचा अंदाज बांधला. मुलीकडून हकीकत ऐकून सोनवणे यांचा डोळे पाणावले. त्यांनी मुलीला चप्पलच्या दुकानात नेले. तुला हवी ती चप्पल घे बाळा असे सांगितले. मुलीने आपल्या आवडीची चप्पल घेतली. आणि आनंदाने शाळेकडे निघाली. त्या चपलीच्या किमतीपेक्षा त्या मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद हा कित्येक पटीने महाग होता तो आनंद आपल्याला देता आला याचा मनस्वी आनंद झाल्याचे सोनवणे यांनी सांगितले. पोलिसातील या बाप माणसाचा फोटो पाहता पाहता तालुक्याभर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचला आणि सर्वच स्थरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.