देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वीर जवान अविनाश पवार अमर रहे…, भारत माता की जय…’ अशा गगनभेदी घोषणांनी देवळा तालुक्यातील भऊर येथील सैन्यदलातील जवान अविनाश केवळ पवार यांच्या पार्थिवावर शनिवारी रात्री लष्करी इतमामात त्यांच्या मूळ गावी भऊर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचक्रोशीसह तालुक्यातील हजारो नागरिकांनी लाडक्या वीर सुपूत्राला साश्रू नयनांनी निरोप दिला.
देवळा तालुक्यातील भऊर येथील सुपुत्र अविनाश केवळ पवार हे गेल्या ११ वर्षापासून २६ मराठा लाईफ इंफॅन्ट्री रेजिमेंट मध्ये नायक पदावर कार्यरत होते. सध्या जम्मू काश्मीर येथे देशसेवा करीत असताना त्यांना अचानक प्रकृतीचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी जबलपूर येथील कमान हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर बरे वाटल्याने ते पुन्हा देशसेवेत रुजू झाले. या दरम्यान पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतांना शनिवारी रात्री १२ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
शनिवारी संध्याकाळी त्यांचे पार्थिव भऊर गावात आणण्यात आले. ‘भारत माता की जय’ ‘वीर जवान अमर रहे’ अशा घोषणांसमवेत गावातील प्रमुख मार्गावरून सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा महिला, आबालवृद्ध, युवकांनी प्रचंड गर्दी केली होती. वीर जवान अविनाश पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी त्यांची आई, पत्नी व पाच वर्षीय मुलगा यांच्यासह नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले.
गावातील मुख्य चौकातील पटांगणावर उपस्थित देवळा तालुक्याचे प्रभारी तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे, सैन्यदलाचे प्रमुख सागर पवार, जिल्हा सैनिक दलाचे शिंदे, सैनिकी सामाजिक संस्था देवळा मांगु लोखंडे, सरपंच दादा मोरे, माजी सुभेदार कारभार पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. सूर्यास्तापूर्वी सैन्यदलाच्या देवळाली येथील आर्टीलरी सेंटरच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडत यावेळी मानवंदना दिली. अविनाश पवार यांचा पाच वर्षीय मुलगा शिव याने पार्थिवाला अग्निडाग दिला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजाई, तीन चुलते असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी तसेच वसाकाचे कर्मचारी रवीकुमार यांचे बंधू तसेच राजाराम पवार, दिनकर पवार, सतीश पवार यांचे पुतणे होत.