अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिकच्या देवळा तालुक्यातील गिरणारे येथे आज सायंकाळी वादळा वाऱ्यासह पाऊस व गारपीट पडल्या. या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी घराच्या भिंती देखील कोसळल्या. एका ठिकाणी अंगावर विटा पडल्याने एका व्यक्तीचा पायाला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्याच्यावर दवाखान्यात उपचार देखील सुरू आहेत .अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतात वास्तव्यास असलेल्या शेतकरी वर्गामध्ये शेतात बांधलेली आपली गुरेढोरे निवाऱ्याला आणण्यासाठी व शेतात झाकून ठेवलेला कांदा आवरण्यासाठी एकच धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. साधारणपणे अर्धा ते एक तास सोसाट्याचे वादळ सुरू होते, वादळी वाऱ्या बरोबरच सुपारीचा आकाराच्या गारा शेतात पडल्याने शेत पांढरे-शुभ्र झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. एकंदरीत मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी दिल्याने गिरणारे परिसरातील शेतकरी सुखावला असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी हा पाऊस उपयोगी राहणार असल्याचे जाणकारांच्या वतीने सांगण्यात येत आहे.