देवळा : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना शास्त्रज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता देवळा तालुक्यातील भऊर येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून देवळा कोविड सेंटरला सामाजिक बांधिलकी जोपासत ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन भेट देत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. भऊर येथील बाबा पवार यांनी समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने हे मशीन देवळा तालुका आरोग्य अधिकारी सुभाष मांडगे, तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांच्याकडे सुपूर्द केले.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः थैमान घातलं होते. या काळात ऑक्सिजन वेळेत मिळाला नाही म्हणून अनेक रुग्णांना दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला. लॉकडाऊनमुळे दुसरी लाट ओसरायला सुरुवात झाल्याचे चित्र असले तरी, शास्त्रज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. ही तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. या काळात देखील ऑक्सिजनचा तुटवडा भासू शकतो, हा भविष्यातील धोका लक्षात घेता, फुल ना फुलाची पाकळी या हेतूने भऊर ग्रामस्थांनी देवळा कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन भेट दिले. यावेळी उपपोलीस निरीक्षक खंडेराव भवर, पं.स.तालुका कृषी अधिकारी प्रशांत पवार, कृषी अधिकारी सचिन देवरे, सचिन भामरे, पंकज पाटील, जगदीश पवार,
गावाच्या एकजुटीचे दर्शन
आपल्या एका छोट्याश्या मदतीने कुणाचा तरी जीव वाचू शकतो. अशा पद्धतीची एक पोस्ट भऊर येथील तरुण बाबा पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली. भऊर ग्रामस्थांनी लगेच या पोस्टला प्रतिसाद देत स्वतःहून पवार यांच्याशी संपर्क करत मदत जमा केली. अवघ्या तीन दिवसात मशीन घेण्यासाठी लागणारी मदत गोळा झाली. भविष्यात देखील काही संकट आल्यावर एकजुटीने त्या गोष्टीचा सामना करू असा विश्वास ग्रामस्थांनी दिला. यातून आमच्या गावाच्या एकजुटीचे दर्शन झाल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले व संपूर्ण ग्रामस्थांचे आभार मानले.
….