देवळा – तालुक्यातील चिंचवे (नि.) येथील सरपंच रवींद्र पवार यांनी खाजगी इसमाद्वारे ठेकेदाराकडून टक्केवारीपोटी २० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. याबाबत समजलेली माहिती अशी की, तक्रारदार ठेकेदाराने तालुक्यातील चिंचवे (नि.)येथे शासकीय निविदानुसार शिवस्मारक उद्यान चौक सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण केले होते. ग्रामपंचायत येथून काम पूर्तता प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असल्याने सदर काम पूर्तता प्रमाणपत्र देण्याकरिता सरपंच रविंद्र शंकर पवार यांनी २१ जानेवारी रोजी एकूण कामाच्या ५ टक्क्यांप्रमाणे २२ हजार रुपयांची मागणी केली होती. सदर रक्कम तडजोडी अंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. यासंदर्भात ठेकेदाराने सरपंच याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून मंगळवारी सापळा लावला होता. सदर तडजोडी अंती ठरलेली २० हजार रुपयांची लाच सरपंच रवींद्र शंकर पवार यांनी खाजगी इसमाद्वारे स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून यामध्ये सरपंच रवींद्र शंकर पवार (४०)आणि खाजगी इसम किशोर माणिक पवार (४०) या दोघांना अटक करण्यात आली आहे.