राजपाल अहिरे
देवळा – ‘देव तारी, त्याला कोण मारी’ असे मराठी भाषेत सुभाषित आहे. याचा तंतोतंत प्रत्यय रामेश्वर येथील बालकास आला. इथे मात्र प्रत्यक्ष देवा ऐवजी देवळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गणेश कांबळे हे तारक ठरले. त्यांनी दाखवलेले प्रसंगावधानाचे सार्थक होऊन बालकास नवजीवन देऊन गेले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रामेश्वर, ता. देवळा येथील सार्थक दत्तू आंबेकर ( वय ११ ) यास गुरुवारी ( दि. १५ ) पहाटेच्या साखरझोपेत असतांना विषारी सापाने चावा घेतला. सकाळी नऊ वाजले तरी सार्थक झोपेतून का उठला नाही हे पाहण्यासाठी त्याचे वडील गेले असता तो बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्यावेळी ताबडतोब त्याला देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश कांबळे व डॉ. निखिल पाडवी यांनी तपासणी केली असता घटनेचे गांभीर्य लक्षात आले. सार्थकच्या श्वसन यंत्रणेवर विषाचा प्रभाव झाल्याने तातडीने व्हेंटिलेटरवर टाकणे गरजेचे होते. मात्र व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने व अधिक उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवणे अत्यावश्यक असल्याने डॉ. कांबळे यांनी प्रसंगावधान राखून क्षणाचाही उसंत न घेता तात्काळ कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर रुग्णवाहिकेत सार्थक सोबत स्वतः मालेगाव पर्यंत गेले. प्रवासादरम्यान अविरत कृत्रिम श्वासोच्छ्वास चालूच ठेवल्याने पुढील उपचार करणे सोपे झाले.
अतिदक्षता विभागात सहा दिवस उपचार घेऊन पूर्ण बरा झालेला सार्थक व त्याच्या सोबत असलेली त्याची आजी देवासमान डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुधवार दि. २१ रोजी देवळा ग्रामीण रुग्णालयात आले. यावेळी साश्रु नयनांनी डॉक्टरांचे आभार मानले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनीही सार्थकचा सत्कार करून त्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉक्टरांच्या प्रसंगावधानाने रुग्णाचा जीव वाचल्याने सर्व थरातून कौतुक व्यक्त केले जात आहे. सामान्य नागरिक सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी तितके उत्सुक नसतात. मात्र देवळा ग्रामीण रुग्णालयात सेवाभाव जपणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे, डॉ. पाडवी, रवींद्र निकम, प्रवीण देवरे, नाना येवला, शिवाजी गांजे, वैशाली कांबळे, प्रतिभा आहेर, अनिता निकम, शशिकांत शिंदे, सुभाष मगर, सुभाष दळवी, राकेश पवार व इतर कर्मचाऱ्यांच्या लाघवी व कार्यतत्पर स्वभावामुळे तालुक्यातील रुग्ण प्राधान्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जात असतात.
रुग्णांचे प्राणरक्षक
दोन वर्षांपूर्वी अपघात झालेल्या एका रुग्णाची हृदयक्रिया बंद पडली होती. अशा गंभीर परिस्थितीत त्याला देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. गणेश कांबळे यांनी तपासणी केली व आपल्या अनुभवाने छातीवर मसाज करून हृदयक्रिया चालू करून रुग्णास अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते. अशा अनेक प्रसंगी ते रुग्णांचे प्राणरक्षक ठरले आहेत.