देवळा : कोरोना संसर्गाने अकाली मृत्यू झालेल्या वर्गमित्राच्या कुटुंबियांची जबाबदारी घेऊन त्याच्या अज्ञान मुलीच्या भविष्यकाळासाठी एक लाख अकरा हजार रुपयांची आर्थिक मदत करणाऱ्या राजधीर फाउंडेशन च्या प्रेरणादायी उपक्रमाने समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खर्डे येथील रहिवासी राजू देवरे ( वय ४८ ) यांना करोनाचा संसर्ग झाल्याने धुळे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन आठवडे उपचार सुरू असतांना दि. १० एप्रिल रोजी त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने देवरे कुटुंबियांवर मोठा आघात झाला. दोन चिमुरड्यांसह कुटुंब कबिला चालवण्याचे मोठा यक्षप्रश्न त्यांच्या पत्नीपुढे निर्माण झाला होता. यांची ही अवस्था पाहून राजुच्या वर्गमित्रांनी स्थापन केलेल्या राजधीर फाउंडेशन च्या वतीने मदतनिधी गोळा करण्याचे ठरले.
यावेळी डॉ. दिलीप बागुल, डॉ. प्रशांत निकम, बापू देवरे, डॉ. प्रमोद आहेर, राजधीर फाउंडेशन चे संचालक प्रकाश भामरे, किरण आहेर, अध्यक्ष बापू देवरे, खजिनदार डॉ. संजय निकम, संचालक हेमराज सोनवणे, शेखर वाघ, अबिद पठाण, भाऊसाहेब आहेर यांनी एक लाख अकरा हजार रुपयांचा मदत निधी जमविला. भविष्यातील गरजा ओळखून राजू देवरे याची लहान मुलगी धनिष्का राजेश देवरे (वय ६ )हिच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेचे खाते खोलून त्यात एक लाख अकरा हजार रुपयांचा मदत निधी जमा केला.
आजच्या स्वार्थी जगात रक्ताचे नातेवाईक कर्तव्यापासून दूर जात असतांना वर्गमित्राच्या मृत्यू पश्चात राजधीर फाउंडेशन ने केलेले काम नक्कीच प्रेरणादायी असल्याची भावना सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.