देवळा : वादळी वारा आणि पावसामुळे मातीच्या घराची भिंत कोसळून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना देवळा तालुक्यातील सावकी येथील आदिवासी वस्तीत घडली. कुटुंबिय झोपेत असतांना रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. जखमींना अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देवळा तालुक्यातील सावकी येथील आदिवासी वस्तीत राहणाऱ्या पठाण कचरू सोनवणे यांचे मातीचे घर आहे. गुरुवारी ( दि. १५) रात्री वादळी वारा आणि पावसामुळे मातीची भिंत कोसळून घरामध्ये गाढ झोपेत असलेले पठाण सोनवणे त्यांची पत्नी सुनीता सोनवणे, मुलगा आकाश सोनवणे व कुणाल सोनवणे हे त्याखाली दबले गेले. शेजारील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढले. यामध्ये तिघांना गंभीर इजा झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना आकाश पठाण सोनवणे ( वय ५ )या चिमुकल्याचा वाटेतच मृत्यू झाला तर सुनीता पठाण सोनवणे (२७) व कुणाल पठाण सोनवणे ( ७) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर पठाण सोनवणे (२९) याला किरकोळ दुखापत झाली आहे.
या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेचा पंचनामा तलाठी कल्याणी कोळी ग्रामसेवक वैशाली पवार यांनी केला असून शासनाने तात्काळ या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.