देवळा : सोमवारी देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात फ्लॉवर विक्रीसाठी आलेल्या बावीस वर्षीय युवा शेतकऱ्याचा बाजार समिती समोरील निर्मल बालरुग्णायाजवळ रात्री १० वाजेच्या सुमारास संशयास्पद मृतदेह आढळून आला असून त्याचा खून झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी देवळा पाच कंदिल येथे रास्ता रोको आंदोलन केले.
खुंटेवाडी येथील दिपक अशोक ढेपले ( २२ ) हा युवा शेतकरी सोमवारी ( दि.१२ ) आपल्या शेतातील फ्लॉवर विक्रीसाठी पिकअप गाडीने देवळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आला होता. रात्री १० वाजेच्या सुमारास बाजार समिती समोरील निर्मल बालरुग्णालयाजवळ त्याचा मृतदेह आढळुन आला. त्याबाबत पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. मात्र चार ते पाच जणांच्या टोळक्याने मारहाण करून त्याचा खून केला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी देवळा पाच कंदिल चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे विंचूर प्रकाशा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
जोपर्यंत याच्यातील सत्यता काय आहे ते समजत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक येथे पाठवण्यात आला आहे. याबाबत अधीक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उपनिरीक्षक महेश निकम, निलेश सावरकर, सचिन भामरे आदी करत आहेत.