देवळा : तालुक्यात कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असतांना आरोग्य विभागाचे २७ कर्मचारी कोरोना बाधित झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असून कोणत्याही क्षणी आरोग्य विभाग व्हेंटीलेटरवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देवळा तालुक्यात दहा दिवस जनता कर्फ्यू पुकारूनही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली नाही. या काळात १०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण दररोज सापडत होते. त्यातच २७ आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या व होम क्वारंटाइन केलेल्या अनेक व्यक्तीचा गावागावात मुक्त संचार सुरू असून स्प्रेडरची भूमिका बजावत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या बेफिकीर नागरिकांना शिस्त लावण्यासाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा दिसून येत नाही, त्यातच अनेक गावांमध्ये कोरोनाप्रती स्थानिक प्रशासनाची दिसून आलेली निष्क्रियता देखील कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.
कामचुकारांना समज द्यावी
आ. डॉ. राहुल आहेर यांनी यापूर्वी कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्व शासकीय विभागांची बैठक घेऊन त्यांना एकमेकांशी योग्य समन्वय साधत काम करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु अपेक्षित परीणाम दिसून आला नाही. आ. आहेर यांनी यात लक्ष घालून कामचुकारपणा करणाऱ्या विभागांना समज द्यावी अशी मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे.
त्रिसूत्रीचे पालन करावे
देवळा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून अनेक तरूण व घरातील कर्ते पुरूष कोरोनाला बळी पडले आहेत. अनेक गावात शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब बाधित होत आहेत. हे पूर्ण कुटुंब बाधित झाल्यानंतर त्यांना उपचार घेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यामुळे शेतातील पाळीव जनावरांना चारा पाणी करण्यास देखील घरात कोणी नाही, यामुळे जनावरांची उपासमार होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे आजुबाजूचे शेतकरी देखील जनावरांना चारा पाणी करण्यास धजावत नसल्याचे चित्र काही गावात दिसून आले आहे. मास्कचा वापर, स्वच्छता, व सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचे पालन करावे, कोरोना रुग्णांनी १४ दिवस घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी केले आहे.