बाबा पवार, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देवळा – लोहणेर येथील गिरणा नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरांनी मोबाइल चोरीचा धडाका सुरू केला होता. मात्र, देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या करड्या नजरेत या चोरांच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्याने शिरसाठ यांनी वेळीच चोरांना रंगेहात पकडून ताब्यात घेत, चोरट्यांकडून तीन मोबाईल व दोन मोटारसायकली जप्त केल्या.
यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने बाप्पाच्या विसर्जनाला देखील सर्वत्र मोठी गर्दी दिसून आली. देवळा तालुक्यातील लोहणेर येथील गिरणा नदीपात्रात देवळा तसेच बागलाण अशा दोन तालुक्यातील गणेशभक्त गणपती विसर्जनासाठी येत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. विसर्जन काळात कुठलेही विघ्न येऊ नये म्हणून उपस्थित देवळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना यावेळी गर्दीत काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. शिरसाठ यांनी करडी नजर ठेऊन संशयास्पद हालचाली करणाऱ्या एकाला आपल्या जाळ्यात अडकवून चोरी करतांना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून तीन अँड्रॉइड मोबाईल तसेच एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. तसेच त्या चोराच्या साहाय्याने इतर सहा चोरांचा टप्या टप्प्याने पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यांचेकडून देखील एक मोटारसायकल जप्त करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्ष पुरुषोत्तम शिरसाट यांच्यासह पोलिस नाईक निलेश सावकार, बापू देवरे, पोलीस शिपाई जगताप, कोरडे तसेच पोलीस पाटील अरुण उशिरे यांनी यशस्वी कामगिरी बजावली. पोलीस यंत्रणेच्या या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.