देवळा : तालुक्यात लॉकडाऊन काळातही कोविड रुग्णसंख्या कमी होत नसल्याने प्रशासन अँक्शनमोड वर आले असून तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांच्या नेतृत्वाखाली विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन टेस्ट करून बाधित आलेल्यांना कोविड सेंटर येथे दाखल केले जात आहे.
तालुक्यात रोजच दीडशेच्या जवळपास कोरोना बाधित आढळून येत आहे. शासनाने संचारबंदी घोतित करुन सुद्धा कोरोनाचा प्रभाव वाढतच आहे. नागरिक विनाकारण गावभर फिरतांना आढळून येत आहेत. त्यात गृह विलगिकरणातील कोरोना बाधित रुग्ण देखील दिसून येत असल्याने तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांच्या नेतृत्वाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, महसूल, आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त टीमने खुंटेवाडी, पिंपळगाव (वा.), मेशी, वासोळ या गावात बेशिस्त नागरिकांना पकडून अँटीजेन चाचणी करायला सुरुवात केली असून त्यात बाधित रुग्णांना ताबडतोब देवळा येथील कोविड केअर सेंटरला दाखल करण्यात येत आहे. तालुका प्रशासन अॅक्शन मोड वर आल्याने तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे. तर विनाकारण फिरणाऱ्यांची चांगलीच धावपळ दिसून येत आहे.