नाशिक – नाशिक व सिन्नरच्या विकासासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करणाऱ्या “गारगाई-वैतरणा-कडवा-देव लिंक” नदी जोड प्रकल्पाचा अहवाल राष्ट्रीय जलविकास अभिकरणने (NWDA) महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला सादर केला आहे. नाशिकला मोठे औद्योगिक प्रकल्प येण्यासाठी केंद्र शासनाच्या दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यात नाशिकचा समावेश होणे आवश्यक होते. मात्र पाणी उपलब्ध नसल्याने DMIC च्या पहिल्या टप्यात नाशिक ऐवजी औरंगाबादचा समावेश झाला होता.
आता या नदी-जोड मधून पाणी उपलब्ध होत असल्याने झाल्या केंद्र सरकारमार्फत आवश्यक निधी DMIC च्या माध्यमातून नाशिक-सिन्नर-इगतपुरीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आवश्यक ३२५० दशलक्ष घनफूट पाणी प्रस्तावित “गारगाई-वैतरणा-कडवा-देव लिंक” या नदी जोड प्रकल्पातून DMIC साठी राखीव करण्यात आलेले आहे. तसेच सिन्नरच्या दुष्काळी भागास हा प्रकल्प वरदान ठरणार असून सिन्नर तालुक्याचे एकूण २६२८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे तसेच सिन्नर तालुक्याची पिण्याच्या पाण्याची सन २०५१ पर्यंतची गरज या प्रकल्पातून भागवली जाणार आहे. संपूर्ण सिन्नर तालुक्याचा दुष्काळ दूर करणारी ही योजना आहे.
नाशिक-सिन्नर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी “गारगाई-वैतरणा-कडवा-देव नदी लिंक” योजना राबविण्याचा प्रस्ताव खा.हेमंत गोडसे आणि जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष इंजि. राजेंद्र जाधव यांनी केंद्र व राज्य शासनास सन २०१४ मध्ये सुचवला होता. या नदी जोड प्रकल्पासाठी गेल्या सात वर्षापासून खा. हेमंत गोडसे व इंजि. राजेंद्र जाधव केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. या प्रकल्पास राज्य सरकारने जुलै २०१७ मध्ये तत्वतः मान्यता देऊन NWDA ला सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) करण्याचे निर्देश दिले होते.
तीन महिन्यापूर्वी सिन्नरचे आ. माणिकराव कोकाटे यांचे पुढाकाराने जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांचे दालनात बैठक होऊन सदर प्रकल्पाचा डीपीआर ऑक्टोबर-२०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी दिले होते. त्या नुसार गारगाई – अप्पर – वैतरणा – कडवा – देव नदी लिंक या नदी-जोड प्रकल्पाचा अहवाल पूर्ण झाला असून ह्या प्रकल्पास एकूण एक हजार कोटी इतका खर्च येणार आहे. या प्रकल्पाचे ठळक वैशिष्टे म्हणजे पाणी उपश्यासाठी दहा ठिकाणी सौर उर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच सर्व धरणे रोलर कॉम्पाक्टेड कॉंक्रीट या उच्च तंत्रज्ञानाने बांधण्यात येणार आहेत. तसेच मोखाडा तालुक्यास सुद्धा ४५० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होणार असून आदिवासी भागाचा सुद्धा विकास होणार आहे.
“गारगाई – वैतरणा – कडवा – देव नदी लिंक ” योजना
या नदी जोड प्रकल्पात गारगाई-पिंजाळ-वाघ-वाल ह्या नद्यांवर चार धरणे बांधून 5300 दशलक्ष घनफूट पाणी लिफ्ट करून वैतरणा धरणात टाकण्यात येणार आहे. तेथून पुढे ते पाणी थेट ग्राँव्हीटी पाईपलाईनने हे पाणी कड़वा धरणात आणण्यात येईल. कडवा धरणातून पुन्हा लिफ्ट करून ते पाणी सोनांबे येथे देव नदीच्या उगमात टाकण्यात येणार आहे. देवनदी मार्गे बंधारे व थेट पाईपलाईनद्वारे सिन्नर तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरण्यात येतील. तसेच सिन्नर शहर तालुका व शिर्डीस पिण्यास थेट पाईपलाईनने ६५० दशलक्ष घनफूट पाणी पुरवण्यात येईल.
तसेच थेट पाईपलाईन डुबेरे-रामोशीवाडी-दापूर-दोड़ी-नांदूर शिंगोटे या गावांच्या मार्गे भोजपूर कालव्यास जोडून सर्व पाझर तलाव भरण्यात येतील. पुढे निमोण-तळेगाव-रांजणगाव-मिरपूर-निर्मल पिंप्री-को-हाळे-शिर्डी पर्यंत वाढवून शिर्डीला सुद्धा पिण्याचे पाणी देण्याचे नियोजन आहे. संपूर्ण सिन्नर तालुक्याचा दुष्काळ दूर करणारी ही योजना आहे. या शिवाय पालघर जिल्यातील मोखाड्या तालुक्यास ४५० दश लक्ष घनफूट पाणी राखीव करण्यात आले असून त्यामुळे मोखाड्या सारख्या कुपोषणाने मरण पावणाऱ्या आदिवासी समाजास सिंचनास-पिण्यास पाणी उपलब्ध होणार आहे.
सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) खर्च २३.९३ कोटी राष्ट्रीय जलविकास अभिकरणने डीपीआर तयार केला आहे.
“गारगाई – अप्पर – वैतरणा – कडवा – देव नदी लिंक ” या प्रकल्पाची ठळक वैशिष्टे
एकूण पाच टीएमसी क्षमतेची पाच धरणे
प्रस्तावित धरणाचे नाव नदीचे नाव धरणाची क्षमता (दलघफू) धरणाची लांबी(M) उपसा उंची(M) पाईप लाईन लांबी (M) लागणारी वीज (MW)
उधळे गारगाई ७५० ४७३ २०० ७२२० १५.६०
कोशीमशेत पिंजाळ १४०० १६६० २२४ ६६६० २९.४०
मेट वाघ नदी १५०० ४८२ २६४ ११६२३ २८.८०
निळमाती वाल नदी १२०० ४३० १९० ७०० ८.८०
वैतरणा वैतरणा १०००० ६७१६ Gravity १९००० —-
कडवा कडवा नदी १७०० १४६० Gravity —–
कडवा ते सोनांबे देव नदी ५० अस्तिवातील धरण १६५ ४३.५०
“गारगाई – वैतरणा – कडवा – देव नदी लिंक ” योजनेची ठळक वैशिष्टे
प्रस्तावित पाणी वापर लाभ होणारे तालुके
पिण्यास ६५० दशलक्ष घनफूट सिन्नर-शिर्डी
उद्योगास(DMIC) ३२५० दशलक्ष घनफूट नाशिक-इगतपुरी-सिन्नर
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरीडोर
सिंचनास १७०० दशलक्ष घनफूट सिन्नर
एकूण खर्च ६६४६ कोटी
लाभ व्यय गुणोत्तर ३.२६