नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज मोठे भाष्य केले आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. या आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. येत्या काही दिवसातच त्याचा निकाल जाहीर होणार असल्याचे बोलले जाते. तसेच, या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात प्रथमच झिरवाळ यांनी जाहीरपणे प्रणतच भाष्य केले आहे.
तुमच्याकडे आमदारांचं प्रकरण आल्यावर काय करणार? असा प्रश्न विचारला असता झिरवाळ म्हणाले की, येऊ दे तर खरी. आल्यावर पाहू. मी त्या आमदारांना अपात्र म्हणून पाठवले तर ते अपात्रच होतील. माझ्याकडे आल्यावर त्यांना अपात्रच करेन, असे झिरवाळ ठामपणे म्हणाले. विरोधी निकाल लागला तर मी चुकीचा निर्णय दिला असे होईल. मी घटनेला धरुन निकाल दिला आहे. मग घटना चुकली असे म्हणता येईल का? मी दिलेला निर्णय बरोबर आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा चर्चेला आला आहे.
मी सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो
राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. याविषयी ते म्हणाले की, ही चर्चा एक-दीड महिन्यापासून आहे. आम्ही गेलो तर अजित दादा जातील ना.. पण आम्हालाच काही माहित नाही, त्यामुळे याला अर्थ नाही.. या चर्चांचा आणि राजीनाम्याचा (शरद पवार यांचा राजीनामा) काही संबंध नाही.. लोक विचारतात सत्ता संघर्षात सरकार गेल्यावर काय होईल? मी म्हणालो मलाही मुख्यमंत्री करा.. मी काय मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? असा सवालही झिरवाळ यांनी गंमतीने माध्यमांनाच विचारला
Deputy Speaker Narhari Zirwal on 16 MLA Disqualification