अहमदाबाद – महिला या घरापासून कार्यालयापर्यंत कुठेही सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. चक्क उपजिल्हाधिकाऱ्याने महिला अधिकाऱ्याला अश्लिल मेसेज पाठवून तिचा छळ केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
महिला अधिकाऱ्याला अश्लील फोटो व संदेश पाठवून त्रास दिल्याबद्दल तसेच अधिकृत पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी मोडासाचे उपजिल्हाधिकारी मयंक पटेल याला अटक केली. एका महिलेचे घर शोधून तो तिच्या मागे लागला तसेच तिच्या कौटुंबिक आणि सरकारी कामात ढवळाढवळ करू लागला. या प्रकरणी आरोपीला दोषी ठरवण्यात येऊन ताब्यात घेण्यात आले होते. स्थानिक न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, उपजिल्हाधिकारी मयंक पटेल हे मोडासा येथे कार्यरत आहेत, त्यांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून त्यात आक्षेपार्ह अश्लील फोटो, व्हिडिओ आणि अश्लील चॅट जप्त करण्यात आले आहेत.
संशयीत आरोपी हा गेल्या दीड वर्षांपासून महिला अधिकाऱ्याचा छळ करत होता. मयंकने त्याच्या एका अधिकृत मोबाईल क्रमांकाशिवाय आणखी ८ सिम घेतले होते, त्याद्वारे तो पीडितेला आणि तिचा पती, मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्यांना घाणेरडे आणि अश्लील मेसेज फोटो पाठवत असे.
महिला अधिकाऱ्याने त्या मोबाइल क्रमांकावरून फोन उचलला नाही तर दुसऱ्या क्रमांकावरून किंवा दुसऱ्याच्या मोबाइलवरून व्हिडिओ कॉल करून तिला त्रास द्यायचा. पीडितेने त्याचा फोन उचलणे बंद केल्यावर त्याने तिच्या पतीला फोन करून धमकावले. तसेच पीडित महिला अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, मयंकने तिचे सासरे, पती आणि मुलालाही आक्षेपार्ह फोटो आणि मेसेज पाठवण्यास सुरुवात केली होती. गुन्हे शाखेने मंगळवारी मोडासा येथून आरोपी मयंक पटेल याला अटक केली. त्याला स्थानिक न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जामीनावर जामीन मंजूर केला.
गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, दोघांची सुमारे पाच वर्षांपूर्वी एका सरकारी कार्यक्रमात भेट झाली होती. आरोपी मयंक पटेल हा खेडा जिल्ह्यातील कपडवंज गावातील आहे. हे दोघे भेटले तेव्हा ते नायब तहसीलदार होते आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. महिला अधिकारी वर्ग २ ची अधिकारी देखील असून मयंक त्यानंतर उपजिल्हाधिकारी झाला. पुढे पीडितेच्या कुटुंबीयांशी संबंध प्रस्थापित केल्यानंतर मयंकनेही घरी येण्यास सुरुवात केली होती.