नाशिक – गेल्या काही दिवसांपासून देवळाली मतदारसंघात एकच जोरदार चर्चा होती की, कोरोनाच्या संकटात स्थानिक नगरसेवक, आमदार आणि खासदार नक्की कुठे आहेत. सर्वसामान्यांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी हाताची घडी घालून बसले आहे की काय, असे मेसेज सोशल मिडियात पोस्ट होत आहेत. या सर्व वातावरणात देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. कोरोना संकटाचे निवारण करण्यासाठी अहिरे यांनी स्थानिक विकास निधीतून थेट ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
अहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली मतदार संघातील नाशिक महापालिका रुग्णालय, जिल्हा परिषद रुग्णालय, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालय, भगूर नगर परिषद, शासनाचे उप-रुग्णालये येथील कोविड रुग्णांकरीता स्थानिक विकास निधी अंतर्गत २०२१-२२ वर्षासाठी ५० लाख रुपये निधी दिला आहे. या निधीतून ऑक्सिजन कान्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन सिलेंडर व ऑक्सिजन रेग्यूलेटर्स, वायपॅप मशिन्स, हाॅस्पिटल बेडस्, आयसीयु बेडस्, व्हायरल साईन माॅनिटर्स, एनआयसीयु व्हेन्टीलेटर्स, स्ट्रेचर, पेशंट ट्राॅली, इमर्जन्सी ट्राॅली, फार्मासिटिकल फ्रिज, व्हॅक्सीन बाॅक्स, कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक औषधे व साधन सामुग्री आदी खरेदी केली जाणार आहे. या सर्व बाबींचा सर्वसामन्यांना मोठा लाभ होणार आहे. सद्यस्थितीत नागरिकांना आरोग्य उपचारांसाठी वणवण भटकावे लागत आहे. ५० लाखांच्या निधीतून उत्तम आरोग्य सुविधा देवळाली परिसरात उपलब्ध होणार आहेत, असे अहिरे यांनी सांगितले आहे.