जे एस पवार, नाशिक
देवळा तालुक्यातील एका शेतकरी पुत्राचा यशोप्रवास थक्क करणार आहे. महावितरणच्या पुणे ग्रामीण मंडळात कार्यरत असलेले अधिक्षक अभियंता श्री राजेंद्र विष्णू पवार हे आता मुख्य अभियंता झाले आहेत. त्यांची आजवरची वाटचाल सर्वांसाठी आदर्शवतच आहे. कनिष्ठ अभियंता ते मुख्य अभियंता हा त्यांचा यशोप्रवास वाटतो तेवढा सोपा नाही.
राजेंद्र पवार हे गेल्या पाच वर्षांपासून महावितरणच्या पुणे ग्रामीण मंडळात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा जन्म १७ जून १९६७ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. राजेंद्र पवार हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील भऊर या गावचे आहेत. विशेष म्हणजे, शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेती प्रश्नांची आणि अडचणींची चांगलीच जाण आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे झाले. वडील ग्रामसेवक म्हणून नोकरीला असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असे. त्यामुळे त्यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण त्यांच्या मामाच्या गावी पूर्ण केले.
शालांत परीक्षेत दहावीच्या परीक्षा केंद्रात ते प्रथम आले. अभियांत्रिकी शिक्षणाची ओढ असल्याने त्यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदविका शासकीय तंत्रनिकेतन, धुळे येथून विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. त्यावेळी ते महाराष्ट्रात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यामुळे सहाजिकच त्यांना पुढे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवेत्तर प्रवेश मिळाला. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी ही पदवी विशेष प्राविण्यसह १९८८ मध्ये प्राप्त केली. परदेशी जाण्याच्या सर्व संधी त्यांना प्राप्त झाल्या. मात्र, वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी 1989 मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून पेण (वाशी तालुका) येथे वीज ग्राहकांची सेवा सुरू केली. ही सेवा गेल्या ३३ वर्षांपासून अखंडित चालू आहे.
राजेंद्र पवार यांनी त्यांच्या सेवाकाळात आत्तापर्यंत कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता या पदांवर काम केले आहे. आता ते मुख्य अभियंता पदावर पदोन्नत झाले आहेत. त्यांनी त्यांच्या सेवाकाळात पेण, कळवण, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर, पनवेल, कल्याण, पुणे, नागपूर येथे सेवा बजावली आहे. महावितरण कंपनीची नोकरी ही पगारी समाजसेवा आहे, असे मानून त्यांनी ग्राहक सेवा केली.
आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी पुढाकार घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मुंबईतील २००५ च्या महापुरात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांनी ५० कर्मचाऱ्यांच्या पथकाचे नेतृत्व केले. मुंबईत सलग १० दिवस थांबून वीज पुरवठा पुर्ववत केला. कोरोनाच्या संकटकाळात २०२० च्या जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळाने आतोनात नुकसान केले. त्यात पुणे ग्रामीण मधील साडेपाच हजार वीज खांब कोसळले. त्यामुळे मोठ्या भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. राजेंद्र पवार यांनी स्वतःच्या नेतृत्वात हे काम युद्ध पातळीवर एका महिन्यात पूर्ण केले. त्यामुळेच अनेक गावांचा वीज पुरवठा सुरू होऊ शकला. समाजाप्रती उत्तरदायित्वाची जाण असल्याने राजेंद्र पवार वेगवेगळ्या सामाजिक कार्यातही भाग घेत असतात. त्यांच्या या कार्याला आपण सलाम करणेच योग्य आहे.
Deola Son Rajendra Pawar Chief Engineer Life Journey
MSEB MSEDCL Mahavitaran