बाबा पवार, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देवळा तालुक्यात मोटारसायकल चोरी, मोबाईल चोरी सारख्या भुरट्या चोऱ्या सुरूच आहेत. मात्र, आता चोरांची मजल दुकानाचे शटर तोडण्यापर्यंत गेली आहे. केवळ एक बोटल दारू आणि गल्ल्यातील सुट्टे पैसे चोरट्यांनी देशी दारु दुकानातून लांबविले आहेत. देवळा-कळवण रोडवरील सम्राट कंट्री लिकर या दुकानातील पंधराशे ते दोन हजार रुपये लंपास झाले आहेत. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, देवळा-कळवण रोडवर सम्राट कंट्री लिकर (सरकार मान्य देशी दारू दुकान) आहे. हे दुकान नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि. १३) रोजी रात्री साडे नऊ वाजता बंद झाले. रात्री १२ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी दुकानाच्या कंपाऊंड वरून आत प्रवेश केला. दुकानाचे शटर तोडले. गल्ल्यातील अंदाजे सुट्टे पंधराशे ते दोन हजार रुपये चोरांनी काढले. त्यानंतर दुकानातच दारुची एक बाटली घेऊन ती फस्त केली. त्यानंतर चोर मोठ्या दिमाखात तेथून पसार झाले. हा सर्व प्रकार दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर तोडण्याचा देखील प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे संचालक हरीचंद्र कानडे दुकान उघडण्यासाठी आले. तेव्हा त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आला.
याप्रकरणी देवळा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान देवळा शहरात भुरट्या चोरींचे वाढते प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बघा हा सीसीटीव्ही व्हिडिओ
Nashik Deola Liquor Shop Theft Crime CCTV Video