इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – झारखंडमधील देवघर येथे झालेल्या रोपवे दुर्घटनेत बचाव कार्यात अडचणी येत आहेत. सोमवारी बचावकार्य सुरू असताना रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अडकलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र तो हेलिकॉप्टरच्या कॉकपिटजवळ पोहोचला आणि तिथून तो खाली पडला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
व्हीडिओमध्ये ती व्यक्ती भारतीय वायुसेनेच्या (IAF) हेलिकॉप्टरने लटकवलेल्या दोरीला पकडलेल्या अवस्थेत दिसून येते. जेव्हा तो कॉकपिटजवळ पोहोचला तेव्हा तो घसरला आणि खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील बाबा बैद्यनाथ मंदिराजवळील त्रिकूट टेकडीवरील रोपवेवर रविवारी संध्याकाळी काही केबल कार एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. भारतीय हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, देवघर जिल्ह्यात बचाव कार्यात दोन Mi-17 हेलिकॉप्टर सहभागी आहेत. सोमवारी अंधार वाढल्याने बचावकार्य थांबवण्यात आले. मंगळवारी ते पुन्हा सुरू करण्यात आले.
https://twitter.com/amitshukla29/status/1513784895893475332?s=20&t=ot_vhi4QhssZNoW6Txmp-Q
देवघरचे उपायुक्त मंजुनाथ भजंत्री यांनी माहिती दिली की, एनडीआरएफचे एक पथक बचाव कार्यात गुंतले आहे. ते म्हणाले की, स्थानिक लोकही एनडीआरएफला बचाव कार्यात मदत करत आहेत. लोकांनी अफवा पसरवू नका असे आवाहन करून ते म्हणाले की, प्रकरण पूर्णपणे नियंत्रणात आहे. घाबरण्याची गरज नाही. अजूनही अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी संध्याकाळी मंजुनाथ भजंत्री यांनी सांगितले की, बचाव कार्यादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या २ झाली आहे. आतापर्यंत ३२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ३ ट्रॉलीमध्ये १५ लोक अजूनही अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
त्याचवेळी एएनआय वृत्तसंस्थेने भारत सरकारच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, पीएम नरेंद्र मोदी रोपवेच्या घटनेबाबत देवघरमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही बचाव कार्याबाबत चर्चा केली. झारखंडचे मंत्री हाफिझुल हसन यांनी एएनआयला सांगितले की, “एनडीआरएफ, हवाई दल आणि भारतीय लष्कर बचाव कार्य करत आहेत. देखभालीअभावी अपघात होऊ शकतात. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. जीव वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे.
https://twitter.com/ShivAroor/status/1513757447382437889?s=20&t=ot_vhi4QhssZNoW6Txmp-Q