मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी २ हजारची नोट बँकेत जमा करण्यास सुरुवात केली आहे. आश्चर्य म्हणजे अवघ्या पंधरा दिवसांत चलनात असलेल्या नोटांपैकी निम्म्या नोटा बँकांमध्ये परतल्या आहेत.
आरबीआयने काही दिवसांपूर्वी २ हजाची नोट परत घेण्याची घोषणा केली. त्यानुसार ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांना २ हजारची नोट बँकेत जमा करायची आहे. तसेच नोट बदलवून घेण्याची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बँकामध्ये नोटा जमा करणे आणि बदलीचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या महिन्यात २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर २ हजारांच्या निम्म्या नोटा परत आल्या आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरूवारी दिली. यावर्षी ३१ मार्च रोजी देशात ३.६२ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. त्यातील निम्म्या नोटा परत आल्या म्हणजे ९,०५०,०००,००० नोटा परत आल्या आहेत. म्हणजे या घोषणेनंतर आतापर्यंत सुमारे १.८ लाख कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. २ हजारांच्या नोटा चलनातून मागे घेतल्या असल्या तरी त्यांची कायदेशीर मान्यता मात्र कायम आहे.
८५ टक्के नोटा बँकेत जमा
२ हजारांच्या ज्या नोटा परत येत आहेत, त्यापैकी ८५ टक्के नोटा बँकेत जमा झाल्याने परत आल्या आहेत. उर्वरित विविध बँक शाखांमध्ये अदलाबदल करण्यात आल्या आहेत. १९ मे रोजी आरबीआयने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती.
demonetization 2 thousand notes bank deposition