विशेष प्रतिनिधी, मुंबई
गेल्या सात ते आठ वर्षांपासून काँग्रेस पक्षाला मोठे ग्रहण लागले की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध पातळ्यांवर पक्षाच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. सहाजिकच देशभरात पक्षाची पिछेहाट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच विविध राज्यांमध्ये काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये वाद-विवाद सुरू असून काही नेते वारंवार मित्रपक्षांवर दोषारोप करीत स्वतःची आणि स्वः पक्षाची प्रतिमा मलिन करीत आहेत. पंजाब नंतर आता महाराष्ट्रातही असे चित्र दिसून येत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रोज नवनवीन वादग्रस्त विधान करून पक्षाला अडचणीत आणण्याचे काम करीत असल्याचे पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच पटोले यांना पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी होऊ लागली आहे.
पंजाब नंतर महाराष्ट्र कॉंग्रेसचा संघर्षही आता वाढत आहे. पक्षाच्या नेत्यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही या वादात उडी घेतली आहे. या वादाचे मूळ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच असल्याचे कार्यकर्ते म्हणत आहेत. कारण अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून पटोले खुपच चर्चेत आहेत. त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे पक्षात पेचप्रसंगाचे वातावरण निर्माण होत आहे. शिवाय महाविकास आघाडी सरकारमध्येही मतभेद निर्माण होत आहेत. त्यांच्या वक्तव्यावर पक्ष आणि सरकारला विचार करावा लागत आहे.
काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले की, पटोले यांच्या वक्तव्यामुळे आम्ही अस्वस्थ असून आम्ही पक्ष नेतृत्वाकडे वेळ मागितला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार चालवायचे असेल तर पटोले यांना पदावरून हटवावे लागेल. कारण, आपल्या वादग्रस्त वक्तव्यांद्वारे पटोले हे विरोधी पक्ष असलेल्या भाजपला सरकारवर हल्ला करण्याची संधी देत आहेत. तथापि, काही नेते त्यांना पाठिंबा देत आहेत. तसेच आतापर्यंत पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पटोले यांच्याकडून कोणताही पुढाकार घेण्यात आलेला नसल्याचेही दुसऱ्या एका नेत्याने म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकारची अडचण म्हणजे त्यांना पटोले यांच्या वक्तव्यावर दररोज स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. त्याचबरोबर विधानसभेचे नवे अध्यक्ष नेमणे हे देखील सरकारसाठी मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, ही कॉंग्रेसची अंतर्गत बाब आहे, परंतु हा निर्णय घेताना मित्रपक्षांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.