नवी दिल्ली – गौरव कुमार बन्सल आणि रीपक कन्सल या दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन कोरोनामुळे मृत पडलेल्यांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई मागणी केली आहे. या मागणीवर न्यायालयाने केंद्र सरकारकडे उत्तर मागितले आहे. त्यासाठी केंद्र सरकारला उत्तर देण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे. आता ११ जून रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार या याचिकेवर काय उत्तर देते हे महत्त्वाचे ठरणार आहे.
या दोन वकीलांनी दाखल केलेल्या याचिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या प्रमाणपत्रावर मृत्यूच्या योग्य कारणाची नोंद असावी असे म्हटले आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्या कुटुंबियांना भरपाई मिळू शकेल. या याचिकेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम १२ नुसार आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद असल्याचा उल्लेख केला आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने सर्व राज्यांना कोरोनामुळे मृत पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची नुकसाई भरपाई देण्यास सांगितले होते. पण, आता असे केलेले नाही.
याबाबत न्यायमूर्ती अशोक भूषण आणि एम आर शाह यांच्या खंडपीठाने याबाबत कोणत्या राज्याने अशी भरपाई दिली आहे का ? अशी विचारणा केली. त्यानंतर केंद्र सरकारच्या वकीलांनी कोणत्याही राज्याने भरपाई दिलेली नाही असे सांगितले.